नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे. येत्या महिन्याभरात भारतीय हवाई दलात आणखी १० राफेल लाढऊ विमानं दाखल होणार आहेत. यामुळे राफेल विमानांची दुसरी स्क्वॉड्रन तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल. नवीन विमानं आल्यानंतर हवाई दलात राफेल विमानांची एकूण संख्या २१ इतकी होईल. दरम्यान, हवाई दलात अंबाला तळावरील १७ स्क्वॉड्रन पैकी ११ लढाऊ विमाने आहेत. (Major boost for IAF, 10 Rafales to join in one month)
येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजेच ३०-३१ मार्चला तीन लढाऊ राफेल विमाने फ्रान्सहून उड्डाण घेऊन थेट भारतात दाखल होतील. यानंतर पुढील महिन्याच्या मध्यतरी ७ ते ८ लढाऊ विमानं आणि त्याचं प्रशिक्षण देणारं विमान हवाई दलाला मिळेल. यामुळे भारताची मारक क्षमता वाढेल आणि ताकदही वाढेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
याचबरोबर फ्रान्सहून ही सगळी विमानं अंबाला विमानतळावर दाखल होतील. यापैकी काही विमानं हाशिमारा तळावर रवाना करण्यात येतील. तिथे राफेल विमानाची दुसरी स्क्वॉड्रन तयार केली जाईल. दुसरी स्क्वॉड्रन तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. एका स्क्वॉड्रनमध्ये १८ विमानं असतात.
दरम्यान, हाशिमारा हवाई तळ हा पश्चिम बंगालच्या अलीदपुरद्वार जिल्ह्यात आहे. हा तळ भारत-भूतान सीमेजवळ आहे. भारताने २०१६ मध्ये फ्रान्सकडून ३६ राफेल विमानं खरेदीचा सौदा केला होता. या वर्षी एप्रिल अखेरपर्यंत ५० टक्के विमानं भारताला मिळालेली असतील.
हवाई दलाच्या मोहिमांसाठी हाशिमारा हे सामरिक तळ आहे. कारण इथून भूतान आणि चुंबी खोरे जवळ आहे. चुंबी खोऱ्यात भारत, भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात. याचबरोबर,डोकलाम याच भागात आहे. जिथे २०१७ मध्ये भारत-चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.