नवी दिल्ली - कर्नाटकात मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसनं तयारीला सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने पक्ष संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेसनं जोर दिला आहे. यात राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये लवकरच नवीन चेहऱ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याचसोबत पक्षात महासचिव प्रियंका गांधी यांच्यावरही पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनुसार, ओडिशा, हरियाणा आणि बिहारमध्ये नवीन काँग्रेस प्रभारी नियुक्त केले जातील. त्याचसोबत महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे प्रभारीही बदलले जातील. या दोन्ही राज्यातील विद्यमान प्रभारी दिनेश गुंडोराव आणि एचके पाटील यांना अलीकडेच कर्नाटकच्या सिद्धारमैया सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील. कारण याठिकाणी अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. याशिवाय युवा चेहऱ्यांना संधी देण्याबाबत काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची लवकरच बैठक बोलावण्यात येईल. रायपूरच्या पक्षाच्या अधिवेशनात याबाबत ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
काँग्रेसमधील पक्षातंर्गत फेरबदलाची प्रक्रिया येत्या १ ते ३ आठवड्यात पूर्ण होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे संबंधित पदाधिकाऱ्यांची यादी पोहचली आहे. राजस्थानात अनेक वर्षापासून पायलट आणि गहलोत गटात वाद सुरू आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये उघडपणे वाद सुरू आहेत. त्याठिकाणी काँग्रेसवर बंडाळीचे संकट आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनिमित्त दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप या नेत्यांमधील वाद संपुष्टात आले नाहीत.
प्रियंका गांधी यांना मिळणार महत्त्वाची भूमिकाहिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व केले होते. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. याआधी प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवले होते. आता प्रियंका गांधी अन्य राज्यांवर लक्ष केंद्रीत करू शकतात.