नवी दिल्लीदेशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलन सोहळ्यात यंदा मोठे बदल करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे संचलनाचे अंतर कमी करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. दरवर्षी राजपथ येथून सुरु होणारं संचलन हे दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत होतं. पण यावेळीचं संचलन दिल्लीच्या विजय चौक येथून सुरु होऊन नॅशनल स्टेडियमपर्यंतच होणार आहे.
यंदाचे संचलन केवळ ३.३ किमीयंदाच्या संचलनाचे अंतर हे निम्म्याहून अधिक कमी करण्यात आलं आहे. दरवर्षी ८.२ किमी इतक्या अंतरावर संचलन केलं जायचं. पण यावेळी हे अंतर ३.३ किमी इतकंच असणार आहे. याशिवाय हे संचलन पाहण्याची संधी देखील मोजक्या लोकांनाच मिळणार आहे. दरवर्षी राजपथावरील संचलन पाहण्यासाठी १ लाख १५ हजारांपर्यंत नागरिक जमा होतात. पण यावेळी फक्त २५ हजार नागरिकांना या संचलनाला उपस्थित राहता येणार आहे. तिकीट काढून दरवर्षी ३२ हजारांहून अधिक नागरिक उपस्थिती लावायचे, पण यावेळी केवळ ७,५०० लोकांनाच तिकीट काढून सोहळ्याला उपस्थित राहता येणार आहे.
लहान मुलांचा समावेश नाहीप्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये यंदा लहान मुलांना सहभागी होता येणार नाही. १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांनाच फक्त या संचलनामध्ये सहभागी होता येईल. शालेय विद्यार्थ्यांना संचलन पाहण्यासाठी केली जाणारी विशेष व्यवस्था देखील यावेळी नसणार आहे. यावेळी उभं राहून संचलन पाहता येणार नाही. जितक्या खुर्च्या उपलब्ध करुन देण्यात येतील तितकेच लोक संचलनाला उपस्थित राहू शकतात.
संचलनाच्या तुकडीचा आकारही कमीसंचलनात यावेळी कमी तुकड्या सहभागी होणार आहेत. यातही प्रत्येक तुकडीतील जवानांची संख्या कमी करण्यात येणार असून यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाणार आहे. दरवर्षी एका तुकडीत १४४ जणांचा समावेश असायचा यावेळी एका तुकडीत केवळ ९६ जण पाहायला मिळतील. संचलनात सहभागी झालेल्या आणि प्रेक्षकांनाही मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय संचलन सोहळ्याकडे येणाऱ्या प्रवेश आणि गंतव्यद्वारांचीही संख्या वाढविण्यात येणार आहे.
१५ जानेवारी रोजी होणार रंगीत तालीमप्रजासत्ताक दिनी भारतीय लष्काराची जी तुकडी संचलनात सहभागी होणार आहे. तिच तुकडी सध्या 'आर्मी डे'साठी देखील तयारी करत आहे. १५ जानेवारी रोजी 'आर्मी डे'च्या संचलनानंतर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. संचलनात सहभागी होणाऱ्या सर्व जवानांसाठी कोविड-बायो बबल तयार करण्यात आले आहे. संचलनात सामील होणाऱ्या सर्व जवानांची आरोग्य आणि कोविड चाचणी घेऊन त्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. कोविड संबंधिच्या सर्व नियमांचं पालन करण्यात येत आहे.