संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षात मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांमध्येही बदल होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्येही परिवर्तनाची चर्चा सुरू झाली आहे.
एनडीए सरकारचे काम सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये बदलाची तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार असून, त्यासाठी बराच वेळ लागू शकतो. देशातील किमान अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका घेणे बंधनकारक आहे. यासाठी तीन ते सहा महिने लागू शकतात. तोपर्यंत नड्डा हे पदावर राहू शकतात. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजप मागासवर्गीय नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकते.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तावडे आणि के. लक्ष्मण यांची नावे आघाडीवर आहेत. विनोद तावडे यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की, त्यांना अध्यक्ष करणे महाराष्ट्रात विधानसभेसाठी फायदेशीर ठरू शकते आणि मराठा समाजाची भाजपप्रति असलेली नाराजी दूर होण्यासही मदत होऊ शकते. राष्ट्रीय अध्यक्षपदाचे सर्व मोठे दावेदार शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, सी. आर. पाटील, मनोहरलाल खट्टर यांना यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे.
२४ राज्यांमध्ये बदल- राज्यांमध्येही मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. यापैकी उत्तर प्रदेश हे सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यात भाजपच्या जागा वाढण्याऐवजी निम्म्याने कमी झाल्या आहेत.अयोध्येसारख्या जागेवरही भाजपचा पराभव झाला.
- यूपीच्या पराभवासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबाबदार ठरविले जात असतानाच उत्तर प्रदेशातील भाजप संघटनेलाही जबाबदार ठरविले जात आहे. देशभरातील दोन डझन राज्यांमध्ये संघटनेत फेरबदल होणार आहेत.
- काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, काही राज्यांमध्ये नव्या अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. हरयाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, दिल्लीसह दोन डझन राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत.