अहमदाबाद: विजय रुपाणी यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पटेल पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भूपेंद्र पटेल यांचं नाव कुठेच नव्हतं. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोरधन झडफिया यांची नावं चर्चेत होती. मात्र भाजप नेतृत्त्वानं भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विजय रुपाणी यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शनिवारी दुपारी रुपाणी यांनी राज्यपालांची भेट घेतली. ते राजीनामा देतील असा अंदाज कोणीही बांधला नव्हता. रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय शुक्रवारी रात्री झाल्याचं समजतं. शुक्रवारी रात्री अमित शाहगुजरातला आले होते आणि सकाळी दिल्लीला परत गेले.
लवकरच मंत्रिमंडळातही मोठे बदल होण्याची शक्यतामुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता भाजप नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी बदल अपेक्षित आहेत. आज तकनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यमान मंत्र्यांना नारळ मिळणार आहे. तर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. रुपाणी यांचा चेहरा घेऊन भाजपनं आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास पक्ष पराभूत होण्याचा अंदाज होईल अशी शक्यता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली होती. त्यामुळेच रुपाणी यांना हटवण्यात आल्याचं समजतं.
रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी?मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी घेण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भाजपनं या निर्णयाची तयारी आधीपासूनच केल्याचं सांगितलं जात आहे. भाजप अशाप्रकारचे प्रयोग करत आला आहे, वेळोवेळी नेतृत्त्व बदल गरजेचा आहे, असं भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं होतं. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, पाटीदारांची नाराजी, बेरोजगारी यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जात आहे.