हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी गेले सहा महिने झाले तरी विधानसभा अधिवेशनच न घेतल्याने मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. निवडणुकी आधीच काही दिवस विधानसभा भंग करण्याची वेळ भाजप सरकारवर आली आहे. मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
यानुसार सैनी हे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांना भेटले असून रात्री साडे नऊपर्यंत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणात ५ ऑक्टोबरला निवडणूक आहे. सैनी यांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतली होती. परंतू, त्यांनी निवडणुकीच्या आधी काही महिने असूनही पावसाळी अधिवेशन घेतले नाही. दोन अधिवेशनांमधील कालावधी हा कमीतकमी सहा महिन्यांचा असावा लागतो.
या सहा महिन्यांची मुदत गुरुवारी, १२ सप्टेंबरला संपत आहे. यामुळे १३ सप्टेंबरला विधानसभा भंग करण्याशिवाय भाजपकडे पर्याय राहिलेला नाही. यामुळे सैनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून राज्यपाल त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री बनविण्याची शक्यता आहे.
सैनी रात्री पुन्हा राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी ते राजनाम्याची घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सहा महिने संपले तरी अधिवेशन न घेण्याच्या भाजपाच्या भुमिकेचा राजकारणावर आणि मतांवर काय परिणाम होतो, हे देखील येत्या काही दिवसांत समजणार आहे. खरेतर शेवटचे अधिवेशन हे मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महिला मतदारांना महायुतीकडे खेचण्याची रणनिती आखली आहे. परंतू, हरियाणात असे डावपेच का खेळले गेले नाहीत, हे देखील राजकीय तज्ञांना पडलेले कोडे आहे.