जयपूर - न्यायालयीन लढाईत झालेला विजय आणि गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्स्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र आता राम मंदिराच्या बांधकामाच्या मार्गात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला पिंक स्टोन हा राजस्थानमधून मागवण्यात येत असून, राजस्थानसरकारने हा पिंक स्टोन सापडणाऱ्या बंसी पहाडपूर येथील खाणीमधील खोदकामावर बंदी घातली आहे.अयोध्येतील कार्यशाळेमध्ये राजस्थानमधून येणाऱ्या पिंक स्टोनवर कलाकुसर करून त्याला बांधकाम योग्य बनवले जाते. दरम्यान राम मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे तीन लाख घनफूट दगडांची गरज आहे. यापैकी एक लाख घनफूट दगड तयार करण्यात आले आहेत. पैकी २० हजार घनफूट दगड हे रामसेवक पुरम येथे ठेवण्यात आले आहेत. उर्वरित दगड हे बंसी पहाडपूर येथील खाणींमधून अयोध्येत आणण्यात येणार आहेत. मात्र या खाणीमधील खोदकामाला स्थगिती दिल्याने आता राम मंदिराच्या बांधकामालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विषयी आपण योग्य वेळ आल्यावर काही बोलू, असे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील खनिकर्म विभाग, हरातपूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बंस पहाडपूरच्या खाणींमध्ये अवैधरीत्या खाणकाम होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर येथील खाणकामावर निर्बंध घातले होते. त्यानंतर राजस्थान सरकारनेही येथील खाणकामाला स्थगिती दिली होती.दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर कार्यशाळेचे व्यवस्थापक अन्नूभाई सोमपुरा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या बांधकामासाठी १९९० मध्या कार्यशाळा स्थापन करण्यात आली होती. तेव्हापासूनच बंसी पहाडपूर राजस्थानमधून दगड मागवले जात आहेत. सध्या कार्यशाळेचे काम बंद आहे. कारण सुमारे एक लाख घनफूट दगड तासून तयार कऱण्यात आले आहेत. उर्वरित दगड राजस्थानमधून येणार आहेत. मात्र त्यापूर्वी तयार केलेले दगड राम जन्मभूमी परिसरात पोहोचवले जातील. आता जेव्हा कार्यशाळा सुरू होईल तेव्हा ती राम जन्मभूमी परिसरामध्येच सुरू होईल. आमच्याकडे दगडांची कुठलीही टंचाई नाही. आम्हाला राजस्थानमधून पिंक स्टोन उपलब्ध असल्याचे फोन येत आहेत.याबाबत चंपत राय म्हणाले की, ही बातमी सध्यातरी वृत्तपत्रातील आहे. यापूर्वी वसुंधरा राजे सत्तेवर असतानाही खाणींवर बंदी घालण्यात आली होती. सध्यातरी पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी एक लाख घनफूट दगड तासूवन तयार कऱण्यात आलेले आहे. त्यांच्या माध्यमातून राम मंदिराचे बांधकाम करता येईल.असं आहे पिंक स्टोनचं वैशिष्ट्यपिंक स्टोन हे दिसायला सुंदर असतात. तसेच ते मार्बलपेक्षाही चांगले दिसतात. एवढेच नाही तर पिंक स्टोन हे दीर्घकाळा टिकतात. त्यांचे वय साधारणत: एक हजार वर्षांच्या आसपास असते. त्यात राजस्थानमधील बंसी पहाडपूरमधील पिंक स्टोन हे सर्वात चांगले समजले जातात. या पिंक स्टोनचा वापर हा मंदिरांच्या बांधकामासाठी केला जातो. त्यामुळेच राम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील बंसी पहाडपूर येथील पिंक स्टोनचा वापर करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी