मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वपक्षीयांनी केली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये राजकीय पेचप्रसंग तीव्र होत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या एका वक्तव्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. 'कर्नाटक सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे. मोठ्या प्रमाणात षडयंत्र असल्याचा डीके शिवकुमार यांनी दावा केला आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता ते यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात काही मतभेद सुरू असल्याचे बोलले जात आहे.
MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले
काल मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे गृहमंत्री जी परमेश्वरा आणि राज्य सरकारच्या इतर मंत्र्यांसोबत डिनरवर होते, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना बाजूला केल्याचे बोलले जात आहे. खरे तर राज्यात काँग्रेस पक्षाच्या विजयानंतर शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत होते, पण हायकमांडने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आणि सध्या ते तेच पदावर आहेत.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही मोठे चेहरे काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी मोठे षडयंत्र रचले जात आहे. शिवकुमार यांना पाठिंबा देणारे एक आमदार गनिगा रवी यांनी शुक्रवारी रात्री बैठक आयोजित केली तेव्हा त्यांनी हे विधान केले. शिवकुमार यांना पाठिंबा देणारे नेते आणि आमदार या बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान अडीच वर्षानंतर फक्त डीके शिवकुमारच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती.
गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सिद्धरामय्यांची काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शिवकुमार समर्थकांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतल्याचे समजते. गृहमंत्री परमेश्वरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली आणि समाज कल्याण मंत्री एचसी महादेवप्पा या बैठकीला उपस्थित होते. सतीश आणि महादेवप्पा हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या राजकारणात शिवकुमार एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जवळचे मंत्री सतीश जारकीहोळी २० आमदारांसह परदेश दौर्याची योजना आखत असल्याचे सांगितले जात आहे, याकडे त्यांचे ताकदीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.