दिनजान : अरुणाचल प्रदेशालगत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या तैनातीची फेरआखणी करण्यात येत आहे. लष्कराने नेहमी युद्धसज्ज असण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत गेल्या दोन वर्षांपासून जो संघर्ष सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करामध्ये या हालचाली सुरू आहेत.
अरुणाचल प्रदेशचा सीमावर्ती भाग अतिशय संवेदनशील आहे. तिथे रस्ते व पूलबांधणी, दारुगोळा कोठारे यांची बांधकामे वेगाने सुरू आहेत. भारतीय लष्कराला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे.
२ माउंटन डिव्हिजनचे जनरल कमांडिंग ऑफिसर (जीओसी) मेजर जनरल एम. एस. बैन्स यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चीनच्या सीमाभागात भारतीय लष्कर अधिक सतर्क झाले आहे. ही सीमा ओलांडून होणारे घुसखोरीचे प्रकार रोखण्यासाठी पूर्वी लष्कराचे जवान तैनात असत. आता ही जबाबदारी आसाम रायफल्सकडे सोपविण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या दिबांग खोऱ्यात रस्ते, पूल, बोगदे, हेलिपॅड व इतर सुविधांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाभागात चीनने आपल्या हद्दीत जागोजागी मोबाइल टॉवर बसविले आहेत. त्यामुळे भारताने अरुणाचल प्रदेशातील किबितू, हायुलिआंग भागात ४ जी टॉवरचे जाळे विस्तारण्यावर भर दिला आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीत अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या सीमाभागात अनेक सुविधांची उभारणी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.