नवी दिल्ली, दि. 22 - मुस्लिम समाजातील महिलांवर अन्याय करणा-या तिहेरी तलाकच्या प्रथेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिला आहे. या निकालाच्या निमित्ताने मुस्लिम समाजात घटस्फोटाला नेमकी काय कारणं ठरतात त्यावर एक नजर टाकूया.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बहुतांश जोडप्यांच्या घटस्फोटांना त्यांचे पालक आणि कुटुंबिय जबाबदार असतात. कुटुंबियांची फूस असल्यामुळे घटस्फोटाचे पाऊल उचलले जाते. मार्च ते मे 2017 या कालावधीत एका सर्वेक्षण करण्यात आले. एकूण 20,671 जणांशी चर्चा करण्यात आली. या सर्वेमध्ये 16,680 पुरुष आणि 3,811 महिलांची मते जाणून घेण्यात आली.
- पालक आणि कुटुंबियांची फूस असल्यामुळे 13.27 टक्के घटस्फोट होतात.
- हुंडयाची मागणी पूर्ण करता न आल्यामुळे 8.41 टक्के घटस्फोट होतात.
- नव-याचे परस्त्रीबरोबर प्रेमप्रकरण हे 7.41 टक्के घटस्फोटांना कारण ठरते.
- मूलबाळ न होणे हे 7.08 टक्के घटस्फोटांचे कारण असते.
- पत्नी चांगली गृहिणी नाही म्हणून 6.19 टक्के घटस्फोट होतात.
- नव-याला नोकरी नाही किंवा नोकरी जाणे हे 4.87 टक्के घटस्फोटांचे कारण असते.
- लैंगिक सुखाची कमतरता हे 4.42 टक्के घटस्फोटांमागे कारण असते.
- नव-याला पत्नी आवडत नाही या आधारावर 3.54 टक्के घटस्फोट घेतले जातात.
- मुलगा होत नाही हे 2.65 टक्के घटस्फोटाचे कारण असते.
- पत्नीच्या आजारपणाचे कारण पुढे करुन 2.65 टक्के घटस्फोट घेतले जातात.
- क्षणिक रागातून 0.44 टक्के घटस्फोट होतात.
- दारुच्या अंमलाखाली 0.88 टक्के घटस्फोट होतात.
- 37.61 टक्के घटस्फोट काही अन्य कारणांमुळे होतात.
गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल सुनावला आहे. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिला आहे. तसेच, केंद्र सरकारनं सहा महिन्यांमध्ये तिहेरी तलाकला बंदी घालणारा कायदा बनवावा, असे निर्देश सरन्यायाधीश खेहर यांनी दिले आहेत. दरम्यान, कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर 6 महिने बंदी घालण्यात आली आहे.