नवी दिल्ली - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे.
तर जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी उत्तर काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवानांची फौज तैनात करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनंतरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. काही सूत्रांच्या माहितीनुसार कलम 35 ए हटविण्यावरुन राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कलम 35 ए हटविण्यावरुन फुटिरतावादी नेत्यांनी विरोध केला आहे. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीही कलम 35 ए म्हणजे बॉम्ब आहे. जर तुम्ही त्याला हात लावाल तर स्फोट होईल आणि या स्फोटात तुम्ही जळून खाक व्हाल असा इशारा दिला आहे.
काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांची कोणतीही कमी नाही असं असताना केंद्र सरकारकडून 10 हजार अतिरिक्त जवान तैनात करुन लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. कलम 35 ए हटविणे ही राजकीय समस्या आहे. त्या समस्येचं निरसन लष्करी सैन्य करु शकत नाही असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.
काश्मीरच्या रक्षणासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढणार आहोत. आपल्याला एका मोठ्या लढाईसाठी तयार राहण्याची गरज आहे. निवडणुका येतील अन् जातील मात्र जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जासाठी आपल्याला लढत राहिलं पाहिजे. हे राज्य वाचविण्यासाठी कोणत्याही थराला आम्ही जाऊ शकतो असं मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.