ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 8 - तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुकमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात शशिकला व ओ पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. ओ. पन्नीरसेल्वम यांनी शशीकला यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. मंगळवारपासून येथील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत.
'पक्षातील कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केल्यास राज्यपालांची भेट घेऊन आपण दिलेला राजीनामा मागे घेऊ. शिवाय, भाजपाच्या इशा-यांवरुन काहीही करत नसून, आपण पक्षाचा कधीही विश्वासघात केला नाही', असे पन्नीरसेल्वम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एकीकडे स्पष्टीकरण देत असताना पन्नीरसेल्वम यांनी 'विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करुन दाखवेन', असे सांगत शशीकला यांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. 'जनता मला पसंत करते आणि दबावाखाली येऊन राजीनामा दिला', असेही यावेळी पन्नीरसेल्वम म्हणाले.
यावेळी, पन्नीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या मृत्यूचा मुद्दाही उपस्थित करत शशिकला यांच्यावर हल्लाबोल चढवला. जयललिता 75 दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या, यादरम्यान मला त्यांची भेटही घेऊ दिली आहे, असा गौप्यस्फोट करत जयललितांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती, पन्नीरसेल्वम यांनी दिली.
अम्मांनी (जयललिता) जवळपास 16 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळले. मी दोन वेळा मुख्यमंत्री बनलो, हे सर्व काही अम्मा यांच्या इच्छेमुळे झाले. मी नेहमीच अम्मांच्या मार्गाचे अनुसरण केले आहे, असेही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
If party cadres ask me to withdraw my resignation, I will do that: #OPanneerselvampic.twitter.com/6Mw14Dez5n— ANI (@ANI_news) February 8, 2017
I will prove my strength in the assembly: #OPanneerselvam in Chennai pic.twitter.com/5BnNdJIE5i— ANI (@ANI_news) February 8, 2017