हरयाणामध्ये त्रिशंकू; बहुमत कोणालाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 04:02 AM2019-10-25T04:02:46+5:302019-10-25T06:12:44+5:30
भाजपच ठरला सर्वात मोठा पक्ष; पण काँग्रेसही सत्तेच्या जवळ
- बलवंत तक्षक
चंदीगढ : हरयाणात बहुमतासाठी आवश्यक जागा कोणालाच न मिळाल्याने तिथे त्रिशंकू स्थिती आहे. या ९० जागा असलेल्या विधानसभेतील केवळ ४० जागा भाजपने जिंकल्या आहेत. काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या आहेत. जननायक जनता पार्टीने १० जागा जिंकल्याने त्या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरणार आहेत.
मात्र सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजपचे नेते व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यातील पराभवानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बराला यांचाही पराभव झाला असून, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्याने हरयाणातील मतदारांचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आभार मानले आहेत.
काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी सर्व विरोधी पक्षांशी आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत बोलणी सुरू केली आहेत. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस किंवा भाजप यापैकी कोणाला पाठिंबा देणार याबद्दल जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी मौन बाळगले आहे. दुष्यंत चौटाला हे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे पणतू आहेत.
विरोधी पक्षांशी काँग्रेसची चर्चा
अपक्षांना आपल्या बाजूला काँग्रेसही प्रयत्नशील आहे. तसे प्रयत्न भूपिंदरसिंह हुडा करीत आहेत. पण भाजप तसेच केंद्र व राज्य सरकार अपक्षांना प्रलोभने दाखवित आहे, असा आरोप भूपिंदरसिंह हुडा यांनी केला. काँग्रेसने मिळविलेल्या यशाबद्दल हुडा यांचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभिनंदन केले.