नवी दिल्ली - विमान प्रवास म्हटलं तर अनेकांना त्याचे तिकीट दर ऐकून धडकी भरते. मात्र इंडिगो या एअरलाइन्सने खास प्रवाशांसाठी समर सेल ऑफरची सुरुवात केली आहे. कमीत कमी खर्चात नॅशनल आणि इंटरनॅशनल टूरची सफर करण्याची संधी इंडिगोने दिली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी 999 रुपयांपासून दर सुरु होणार आहेत तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3499 रुपये दर आकारण्यात येणार आहे. आजपासून इंडिगोने या ऑफरची सुरुवात केली आहे.
इंडिगोकडून ही ऑफर 11 जूनपासून 14 जूनपर्यंत या कालावधीसाठी देण्यात आली आहे. या कालावधी दरम्यान तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना 26 जून ते 28 सप्टेंबरपर्यंत प्रवास करण्याची मुभा आहे. या समर ऑफरसाठी इंडिगोकडून 10 लाख जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच या ऑफरमध्ये इंडसइंड बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन तिकीट बुक करणाऱ्यांना 20 टक्के कॅशबॅकही देण्यात येणार आहे. याचा लाभ कमीत कमी 4 हजारांवरील तिकीट विक्रीवर ठेवण्यात आला आहे. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर करत असाल तर त्यावर 5 टक्के अथवा 1000 रुपये कॅशबॅक मिळू शकेल. मात्र त्यासाठी तुम्हाला 6 हजारांपर्यंत व्यवहार करावा लागेल. मोबिक्विकचा वापर करुनही तुम्ही 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.
इंडिगोच्या वेबसाईटनुसार दिल्ली ते अहमदाबाद तिकिटाचा सुरुवातीचा दर 1 हजार 799 रुपये असेल. तर दिल्ली भूवनेश्वर दरम्यान तिकीट 2 हजार 499 रुपये आहे. दिल्ली ते अबू धाबी तिकीट 6 हजार 799 रुपये आहे. दिल्ली अमृतसर तिकीट 1 हजार 799 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बंगळुरुवरुन बँकॉकला जाणाऱ्या तिकिटाचे दर 6 हजार 899 रुपये आहे. कोलकाताहून बँकॉकला जाणाऱ्या फ्लाईटची किंमत 5 हजार 99 रुपये आहे. तर हैदराबाद येथून बँकॉक तिकीट 6 हजार 899 रुपये, दिल्ली-दुबई किंमत 7 हजार 799 रुपये आणि दिल्ली कुआलालंपूर तिकीट 6 हजार 599 दर आहे.