नवी दिल्ली : सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ल्यात ४४ जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.सर्व राजकीय नेत्यांनीही या भेकड हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे भारतही काही जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण भारत जवानांच्या मागे ठामपणे उभा आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, राज्यपाल सत्यपाल मलिक तसेच माजी संरक्षणमंत्री शरद पवार व मुलायम सिंह यादव, योगी आदित्यनाथ यांनीही हल्ल्याचा धिक्कार केला आहे.भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. पण त्यातून पाकला धडा मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता कायमस्वरूपी अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली एक घाव घालून पाकचे जे दोन तुकडे केले होते, तशीच कारवाई भारताने करायला हवी, अशीच चर्चा सुरू आहे.पंतप्रधान मोदी यांनी आता ५६ इंची छातीचा प्रभाव पाकिस्तानला दाखवावा, असेही काहींनी म्हटले आहे. मात्र कठीण प्रसंगी राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असावा, असेच दिसत आहे. मात्र काश्मीरमध्ये आज झालेला भयानक दहशतवादी हल्ला पाहता संपूर्ण देशानेच दहशतवादाविरोधात काय भूमिका घ्यायची, हे ठरवण्याची वेळ येऊ न ठेपली आहे.- दत्तात्रय शेकटकर, लेफ्ट. जनरल (निवृत्त )
पाकला कायमस्वरूपीच अद्दल घडवा; देशभर संतापाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:23 AM