'मेक इन इंडिया'ला (Make in India) चालना देण्यासाठी, भारतीय हवाई दल (India Air Force) भारतात सुमारे 100 अत्याधुनिक लढाऊ विमाने बनविण्यासंदर्भात योजना आखत आहे. यासाठी हवाई दलाने जागतिक पातळीवरील विमान उत्पादकांशी बोलणीही सुरू केली आहेत.
यासंदर्भात आज तकने लष्करातील उच्च स्तरीय सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रोजेक्टसाठीचे जवळपास 70 टक्के पेमेंट हे भारतीय चलनाद्वारेच केले जाईल, असे पहिल्यांदाच घडेल. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत भारतात एकूण 96 विमाने तयार केली जातील. यांपैकी 36 विमानांचे पेमेंट भारतीय आणि परकीय चलनाद्वारे केले जाईल. तर, 60 विमानांचे पेमेंट केवळ भारतीय चलनाद्वारेच केले जाईल.
114 विमानं खरेदी करण्याचीही योजना -तब्बल 114 विमाने खरेदी करण्याचीही भारतीय हवाई दलाची योजना आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाची क्षमता तर वाढेलच, शिवाय मिग सीरीजची विमानेही बदलली जातील. प्रोजेक्टमधील सुरुवातीची 18 विमाने परदेशी व्हेंडर्सकडून घेतली जातील. एका कॉम्पिटिशन अंतर्गत या विमानांची चाचणी घेतली जाईल. यानंतरच ही विमाने निवडली जातील. या प्रोजेक्टच्या शर्यतीत बोइंग (Boeing), लॉकहीड मार्टिन (Lockheed Martin), एमआयजी (MIG), डसॉल्ट (Dassault) आणि साब (Saab) सारख्या कंपन्या आहेत. हा प्रॉजेक्ट आगामी तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.