चंदीगड : जाट आंदोलनाच्या वेळी सोनेपतजवळील मुरथाल या गावी महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटनांसंबंधी वृत्ताची दखल घेत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला स्वतंत्ररीत्या चौकशीचा आदेश दिला आहे. दरम्यान सरकारने अशा आरोपांसंबंधी तक्रारी स्वीकारण्यासाठी उप महासंचालकांसह तीन महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे.याप्रकरणी पुढील सुनावणी निश्चित करण्याबाबत न्या. एन.के. संघी यांनी मुख्य न्यायाधीशांना लेखी कळविले आहे. बलात्काराबाबत वाच्यता न करता पीडितांच्या कुटुंबीयांनी घरी परतावे असा सल्ला पोलिसांनी दिल्याबद्दल न्यायाधीशांनी टीका केली. बलात्काराच्या घटना केवळ अफवा असल्याचा दावा एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने केला आहे. समाजात तणाव निर्णाण होईल असे लिहिण्यापासून दूर राहावे असा सल्लाही या अधिकाऱ्याने दिला. हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी काही महिलांनी स्थानिक ढाब्यावर आश्रय घेतला होता अशी माहिती मिळाली असली तरी बलात्काराचे वृत्त खोटे आहे, असे सूत्रांनी म्हटले. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर मुरथालजवळ अमरिक सुखदेव ढाब्यावर काही गुंडांनी १० महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले होते. सुमारे ३० समाजकंटकांनी वाहनांवर दगडफेक केल्यानंतर अनेक महिलांनी आश्रयासाठी धाव घेतली असता त्यांना लगतच्याच शेतात फरफटत नेऊन कुकर्म केल्यानंतर नराधमांनी नग्न अवस्थेत सोडले होते, असे या वृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)राज्य सरकारची हेल्पलाईन...पीडित महिलांनी लैंगिक अत्याचाराबाबत माहिती द्यावी यासाठी राज्य सरकारने हेल्पलाईन जारी केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक राजश्री सिंग, पोलीस अधीक्षक भारती डाबास आणि पोलीस अधीक्षक सुरिंदर कौर या तीन महिला अधिकाऱ्यांच्या समितीकडे तक्रारी स्वीकारण्याचे काम सोपविण्यात आले. राज्य सरकारने मानवाधिकार आयोगासारख्या वैधानिक मंडळांना सहकार्य करण्याची तयारीही दर्शविली आहे.
बलात्काराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करा
By admin | Published: February 27, 2016 1:50 AM