पॅरिस : पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या ‘मेक-इन-इंडिया’ योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे. यासाठी ‘एप-१६’ विमाने बनविणारी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरू असलेल्या ‘पॅरिस एअर शो’मध्ये सोमवारी अधिकृत करार झाला.
या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी ‘एफ-१६’ विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सास राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे. भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.
जुन्या विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास शेकडो नवी लढाऊ विमाने घ्यावी लागणार आहेत. लॉकहीड मार्टिन कंपनीसही ही अब्जावधी डॉलरची ‘आॅर्डर’ मिळविणे गरजेचे होते. परंतु मोदी सरकारने लष्करी साहित्याची परदेशातून तयार स्वरूपात खरेदी न करता त्या उत्पादकांना त्यांच्या मालाचे उत्पादन भारतात करण्याची अट घातली. देशाची गरज भागावी व त्याचसोबत नवे तंत्रज्ञान देशात येऊन स्थानिक उद्योगांचा बळकटी मिळावी हा यामागचा उद्देश होता.
‘मेक-इन-इंडिया’ योजनेत विदेशी उत्पादकाने भारतात उत्पादन करताना एखाद्या भारतीय कंपनीस भागीदार म्हणून सोबत घेणे अपेक्षित आहे. यानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीचे स्वत:चे हित जपत टाटा कंपनीला सोबत घेऊन आता हा करार केला आहे. मात्र भारतात या घडामोडी होत असतानाच आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आली आहे आणि त्यांनीही अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्या जपण्यासाठी भारताप्रमाणे ‘मेक-इन-अमेरिका’चे धोरण स्वीकारले आहे.
परिणामी, लॉकहीड मार्टिन कंपनीने अमेरिकेतील कारखाना बंद करून भारतात नेणे हे तेथील सरकारची नाराजीचे कारण ठरू शकेल. या दोन्ही कंपन्यांनी याचीच जाणीव ठेवून कराराची अधिकृत घोषणा करताना यामुळे अमेरिकेतील नोकऱ्यांवर गदा येणार नाही, याचा आवर्जून उल्लेख केला. दोन्ही कंपन्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले की, ‘एफ-१६’ विमानांचे उत्पादन भारतात झाले तरी त्यामुळे त्यासाठी सध्या अमेरिकेत माल, साहित्य व सेवा पुरविणाऱ्या हजारो पुरवठादारांना काम मिळतच राहील. शिवाय याने भारतात नव्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होऊन लढाऊ विमानांच्या उत्पादन क्षेत्रात भारतीय उद्योगांनाही महत्त्वाची भूमिका बजावता येईल.
भारतीय हवाई दलाला अशाच प्रकारे देशात उत्पादित केलेली ‘ग्रिप्पेन’ लढाऊ विमाने पुरविण्याची तयारी स्वीडनच्या ‘साब’ कंपनीनेही दर्शविली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी अद्याप कोणी भारतीय भागीदार निवडलेला नाही. गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले असून, रशिया व इस्राएलसोबत अमेरिका हा भारताचा लष्करी सामग्रीचा तिसरा मोठा पुरवठादार आहे. अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान मोदी यांची पहिली भेट २६ जून रोजी होत असताना ‘एफ-१६’ंसंबंधीचा हा करार जाहीर झाला आहे.जगभरातील हवाई दलांमध्ये ‘एफ-१६’ ही पसंतीची लढाऊ विमाने असून, सध्या २६ देशांच्या हवाई दलांमध्ये अशी ३,२०० विमाने वापरात आहेत. वेळोवेळी या विमानांची अधिक प्रगत मॉडेल विकसित होत असतात. भारतात उत्पादन करण्यात येणारी विमाने ही ‘ब्लॉक ७०’ या अत्याधुनिक मॉडेलची असतील.