देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'पासून 'रेप इन इंडिया'कडे; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:58 PM2019-12-10T13:58:02+5:302019-12-10T13:59:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, मात्र महिलांच्या विरोधातील अत्याचाराबाबत मोदी गप्प बसले आहेत.
नवी दिल्ली - देशात वाढणारे महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभेत आज काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका करताना भाजपाने ज्या भारताची ओळख मेक इन इंडिया सांगितली होती तो भारत आता रेप इन इंडियाच्या दिशेने वाटचाल करतोय अशा कडक शब्दात भाष्य केलं.
मंगळवारी लोकसभेत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, मात्र महिलांच्या विरोधातील अत्याचाराबाबत मोदी गप्प बसले आहेत. भारत मेक इन इंडियापासून रेप इन इंडियाच्या दिशेने जातोय असं त्यांनी सांगितले.
यापूर्वीही अधीर रंजन चौधरी यांनी महिला मुद्द्यावर भाष्य करताना लोकसभेत म्हटलं होतं की, एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जातंय तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नाव आणि हैदराबाद बलात्काराच्या घटनेवर त्यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उचलला होता.
Adhir Ranjan Chaudhary,Congress in Lok Sabha: Unfortunate that Prime Minister who speaks on everything, is silent on this issue(crimes against women).From 'make in India', India is slowly heading towards 'rape in India'. pic.twitter.com/UlnkwEE9U5
— ANI (@ANI) December 10, 2019
तसेच लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अधीर रंजन चौधरी यांच्या शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चेदरम्यान हे चित्र पाहायला मिळालं. अमित शहा म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य आहे. आम्हाला सांगितलं जातं की, स्थिती खराब होऊ शकते. रक्त सांडू शकते. मात्र असं काहीही घडलं नाही. काश्मीरात एकही गोळी चालली नाही. ९९.५ टक्के विद्यार्थी परीक्षेत सहभागी झालेत, ७ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व पोलीस ठाण्यात व्यवस्थित काम सुरु आहे. पंचायत समितीच्या निवडणुकाही व्यवस्थित पार पडल्या असल्याची माहिती शहांनी लोकसभेत दिली.
Amit Shah:We don't want to keep them even a day extra in jail,when administration thinks its right time,political leaders will be released.Farooq Abdullah's father was kept in jail for 11 years by Congress,we dont want to follow them,as soon as admin decides,they will be released pic.twitter.com/PTKePOEn7x
— ANI (@ANI) December 10, 2019
दरम्यान, शुक्रवारी अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पलटवार केला होता. काँग्रेसने महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणं चुकीचं आहे. यापूर्वी मी असं कधी पाहिले नाही. बंगाल पंचायत निवडणुकीत बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरलं जातं. बंगालमधील एक खासदार आज मंदिराचं नाव घेतात. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका असं त्यांनी सांगितलं होतं.