ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १४ - परदेशातील नागरिकांनी भारतातील गुंतवणूक वाढवावी यासाठी, भारताला 'मॅन्युफॅक्चरिंग हब' अशी ओळख मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी 'मेक इन इंडिया' या अभियानाचा लोगोच चक्क 'मेड इन पोर्टलँड' असल्याचे समोर आले आहे. भोपाळमधील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना देण्यात आलेल्या उत्तरांद्वारे हा लोगो परदेशी असल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कौर यांना उत्तर देताना मेक इन इंडियाचा हा लोगो बनवण्यासाठी कोणत्याही निविदा (टेंडर) मागवण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट केले. मात्र २०१४-१५ मध्ये क्रिएटिव्ह एजन्सी नेमण्यासाठी मंत्रालयातर्फे निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्या आधारावर 'विडेन+केनेडी इंडिया लिमिटेड' या कंपनीची 'मेक इन इंडिया' लोगो बनवण्यासाठी निवड करण्यात आली आणि त्यांच्या भारतीय शाखेने हा लोगो बनवला असे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. मूळची पोर्टलँड येथील ओरेगॉन येथील असलेल्या या सर्वात मोठी अॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या अॅमस्टरडॅम, बीजिंग, लंडन, न्यू यॉर्क, शांघाय, टोकियो आणि भारतात शाखा आहेत.
या कंपनीला 'मेक इन इंडिया' अभियानाचा तीन वर्षे प्रचार-प्रसार करण्यासाठी ११ कोटी रुपये देण्यात आल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.