ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेली मेक इन इंडिया ही मोहीम म्हणजे टेक इन इंडिया आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. मेक इन इंडियात कामगार व शेतक-यांना काहीच स्थान नसून यातून फक्त काही मोजक्याच उद्योजकांचा फायदा होणार आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार फक्त सुटबूट वाल्यांचेच ऐकते असा पुनरुच्चार राहुल गांधींनी केला. शेतक-यांच्या दोन आई असतात, एक जन्मदाती आई तर दुसरी म्हणजे जमिन जी त्यांच्या शेतीमध्ये मोलाची भूमिका निभावते, मोदी सरकार शेतक-यांकडून त्यांची आई हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला. मोदी जे बोलतात ते कधीच करत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींनी शेतक-यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यावात असे त्यांनी म्हटले आहे. तर मोदी सरकारच्या काळात शेतक-यांची परिस्थिती खालावली अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.