जमशेदपूर : झारखंडच्या कोल्हान भागात नऊ जणांची ठेचून हत्या करण्यात आली असून, या हत्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. १० मेनंतरच्या घडामोडींमध्ये या हत्या करण्यात आल्या.झारखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सुखदेव भगत यांनी राज्य पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीवर असमाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्यातील सरकारने विश्वास गमावला आहे. १० मेपासून मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरतात, तरीही सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. अखेर या अफवांमुळे पूर्व व पश्चिम सिंहभूम व सरायकेला-खरसावा जिल्ह्यांच्या कोल्हान भागांत ९ जणांचे प्राण गेले.मुलाचे अपहरण करण्याच्या अफवेनंतर १८ मे रोजी ३ जणांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबियांची भगत यांनी भेट घेतली.निर्दोष लोकांची हत्या करण्याच्या कारणांचा खुलासा करण्यासाठी या घटनांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. या घटना पूर्वनियोजित होत्या व त्या सरकारी आशीर्वादाने झाल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या कुटुंबियांची भेटही न घेतल्याबद्दल त्यांनी टीका केली. नगाडी येथील घटना समाजावर कलंक आहे आणि हा भाग मुख्यमंत्री रघुबर दास व राज्यमंत्री शरयू रॉय यांचा आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.या हत्या प्रशासनिक अपयशामुळे झाल्याचा आरोप करताना भगत यांनी म्हटले आहे की, पोलीस असोसिएशनने मुलांचे अपहरण करण्याच्या अफवांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले होते, तरीही अनेकांचे प्राण गेले. ते रोखण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली नाहीत. काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल द्रौपदी मुरमू यांची भेट घेईल व या घटनांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करील. राज्यात हत्येच्या घटना घडत असताना राज्य सरकार हे नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वातील सरकारची त्रिवर्षपूर्ती साजरे करण्यात मश्गूल होते. पीडितांना मुख्यमंत्री भेटले नाहीत; परंतु शरणागती पत्करणाऱ्या नक्षलींचे गुणगौरव करण्यात त्यांनी धन्यता मानली, असा आरोपही भगत यांनी केला.
नऊ जणांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करा
By admin | Published: May 31, 2017 1:01 AM