ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवा, तृणमूलची मागणी, विरोधी आघाडीत PMपदासाठी चढाओढ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 01:07 PM2023-07-19T13:07:31+5:302023-07-19T13:09:35+5:30
Mamata Banerjee: मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आपण सरकार स्थापन करण्याच्या किंवा पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
गेल्या ९ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया नावाच्या आघाडीची घोषणा केली आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आपण सरकार स्थापन करण्याच्या किंवा पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली असून, तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करण्यात आलं आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, जर काँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसेल तर ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवण्यात यावं, अशी आमची इच्छा आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसला सत्तेचा मोह नसून, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसेल, असं स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मोर्चेबांधणी करत असलेल्या विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकताना आघाडीची स्थानपा केली. २६ पक्षांच्या या आघाडीचं इंडिया असं नामकरण करण्यात आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवावे, असे सुचवले. सर्वसंमतीने याला पाठिंबा देण्यात आला.
तसेच विरोधी ऐक्यासंदर्भात होणारी तिसरी बैठक मुंबईत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नसली तरी ती संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर म्हणजे १५ ऑगस्टनंतर होण्याची शक्यता आहे.