लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहून जीवन आणि वैद्यकीय उपचार विमा (मेडिकल इन्शुरन्स) हप्त्यांवरील वस्तू व सेवा कर हटविण्याची मागणी केली आहे.
गडकरी यांनी म्हटले की, नागपूर विभागीय जीवन विमा महामंडळ कर्मचारी संघटनेने यासंबंधी निवेदन आपणास दिले आहे. जीवन व वैद्यकीय उपचार विमा हप्त्यावरील जीएसटी हटविण्याची मागणी त्यात प्रामुख्याने आहे. यावर सध्या १८% जीएसटी लागतो. जीवन विम्यावर जीएसटी लावणे हे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लावण्यासारखे आहे.
ज्येष्ठ नागरिकांवर अधिक बोजा नको
गडकरी यांनी पत्रात म्हटले की, जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या हप्त्यावरील जीएसटी परत घेण्याच्या सूचनेवर प्राधान्याने विचार व्हावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी या कराचा बोजा पेलने कठीण होते. संघटनेच्या इतरही काही मागण्या असून, त्यावरही सहानुभूतिपूर्वक विचार करावा.
विमा घेणाऱ्यांची संख्या वाढतेय; त्यांना दिलासा
आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार विमा घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जीडीपीच्या तुलनेत विम्याचे प्रमाण २०२३मध्ये ३.८ टक्के हाेते. ते २०३५ पर्यंत ४.३ टक्के हाेईल अशी शक्यता त्यात वर्तविण्यात आली आहे. या विमाधारकांना जीएसटी कमी झाल्याचा फायदा हाेईल.