नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशभरात ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा प्रचंड गाजत आहे. अनेक ठिकाणी या सिनेमासाठी हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. तर काही ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करण्यावरून वाद निर्माण होत आहे. काश्मीरातील पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा सिनेमा प्रेरित आहे. बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये द काश्मीर फाइल्स(The Kashmir Files) सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
त्यातच आता भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही(PM Narendra Modi) या सिनेमावर भाष्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.
घराणेशाही लोकशाहीला धोकादायक
घराणेशाहीचा हा लोकशाहीला धोका आहे, त्याविरोधात लढावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. घराणेशाहीच्या विरोधात आपण इतर पक्षांविरुद्ध युद्ध पुकारत असेल तर त्याचा विचार आपल्या पक्षातही करायला हवा. खासदारांच्या मुलांना तिकीट न मिळाल्यास त्याला मी जबाबदार आहे. जर हे पाप असेल तर ते मी केले आहे. इतकं असूनही तुम्ही आमच्यासोबत आहात याबद्दल मी तुमचा आभारी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पीएम मोदींनी जामनगरच्या राजाचाही उल्लेख केला. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, जामनगरच्या राजाने दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या लोकांना आश्रय दिला होता, त्यामुळे पोलंडने युक्रेनमधील आमच्या विद्यार्थ्यांना मदत केली असा उल्लेख पंतप्रधानांनी केला.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील खासदारांनी चार राज्यांतील विजयाबद्दल टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर संसदीय पक्षाच्या बैठकीत भारतरत्न लता मंगेशकर, कर्नाटकातील बजरंग दल कार्यकर्ता हर्षा, युक्रेनमध्ये ठार झालेले भारतीय विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वागतावेळी त्यांना पुष्पहार घातला जात असताना त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पुढे केले. काही क्षणांसाठी नड्डा देखील आश्चर्यचकित झाले, परंतु त्यानंतर लगेचच दोन्ही नेते पुष्पहार अर्पण करताना एकत्र दिसले.