नवी दिल्ली : भारताच्या संयमाची परीक्षा बघण्याची चूक कोणी करू नये, असा स्पष्ट संदेश लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी चीनला देताना भारत उत्तरेकडील सीमावाद हा चर्चा आणि राजकीय प्रयत्नांतून सोडवण्यास बांधील आहे, असे म्हटले. जनरल नरवणे हे शुक्रवारी लष्कर दिनानिमित्तच्या संचलनात बोलताना म्हणाले की, सीमेवर एकतर्फी बदल करण्याच्या कारस्थानाला सडेतोड उत्तर दिले गेले आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान शूर सैनिकांचे बलिदान वाया जाणार नाही. आम्ही वाद बोलणी आणि राजकीय प्रयत्नांतून सोडवण्यास बांधील आहोत. परंतु, आमच्या संयमाची परीक्षा बघण्याची चूक कोणी करू नये, असे जनरल नरवणे म्हणाले.
गलवान शूर सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी देशाला खात्री देऊ इच्छितो आणि भारतीय लष्कर देशाची स्वायतत्ता आणि सुरक्षेला इजा पोहोचू देणार नाही, असेही ते म्हणाले. १५ जून, २०२० रोजी गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांशी थेट कडवी लढत देताना २० जवानांना वीरमरण आले होते. दोन देशांत काही दशकांत झालेली ही लष्करी चकमक खूप गंभीर होती. या संघर्षात चीनने त्यांचे किती सैनिक ठार व जखमी झाले हे अजूनही सांगितलेले नाही. मात्र सैनिक ठार झाल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात चीनचे ३५ सैनिक मारले गेले.