नवी दिल्ली : सरकारने देशात ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधांवर बंदी घालण्यासाठी कायदा करावा आणि प्रेमविवाहास पालकांची संमती घेणे अनिवार्य केले पाहिजे, अशी मागणी भाजप खासदार धरमवीर सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत केली.
हरयाणाच्या भिवानी - महेंद्रगडचे लोकसभा सदस्य धरमवीर सिंह यांनी कनिष्ठ सभागृहात शून्य तासात सांगितले की, देशात प्रेमविवाह वाढल्यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे, तर ‘लिव्ह-इन’ संबंधांमुळे देशाची संस्कृती बदलली आहे, ती नष्ट होत आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधासारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे, ज्याचे गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे आपली संस्कृती नष्ट होत आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ थांबविण्यासाठी देशात कायदा करायला हवा.
‘आंतरजातीय विवाहला कोणीही रोखू शकत नाही’
जर एखादा तरुण व तरुणी एकमेकांना पसंत करत असतील आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला तर त्यांची जातपात कोणतीही असो, त्यांचा आंतरजातीय विवाह कोणीही रोखू शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना मुलगा व मुलीचे पालक किंवा त्यांच्यापैकी एकाचे पालक यांचा विरोध असतो. मात्र, तरीही असे विवाह कोणीही रोखू शकणार नाही. सेक्युलॅरिझम तसेच सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या नावाखाली माकप आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोप केरळमधील एका धार्मिक विचारवंताने केला होता.
त्याला उत्तर देताना पिनाराई विजयन म्हणाले की, माकप किंवा त्या पक्षाची डीवायएफआय ही विद्यार्थी संघटना आंतरजातीय विवाह संस्था ( इंटरकास्ट मॅरेज ब्युरो) म्हणून काम करत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. आंतरजातीय विवाहात झालेली वाढ हा काळानुसार झालेला बदल आहे.