- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांची चर्चा चालू असताना आता प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे नवीन अध्यक्ष करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी ही मागणी करीत पक्षाला सल्लाही दिला की, बिगर-राजकीय लोकांकडून आता काम चालणार नाही. प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते. या सर्व नेत्यांचे असे म्हणणे आहे की, काँग्रेस वेळेआधीच जागी झाली नाही आणि मागच्या निवडणुकीतील पराभवापासून काँग्रेसने धडा घेतला नाही, तर २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येईल.भाजपवर निशाणा साधत काँग्रेस नेते कृष्णन म्हणाले की, सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने धर्माच्या नशेची सवय लावून लोकांना अफूच्या नशेपेक्षा अधिक व्यसनाधीन केले आहे. बिगर-राजकीय लोक आल्याने काँग्रेस कमकुवत होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या जाळ्यात काँग्रेस अडकली जात आहे. काँग्रेस हा मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाचा पक्ष असल्याचे भासविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, जेणेकरून मतांचे धुव्रीकरण करता येईल.आसाममध्ये बदरुद्दीन अजमल, पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीद पीरजादा आणि केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत आघाडी करण्याची काँग्रेसला आवश्यकता नव्हती. असे केले नसते, तर काँग्रेसविरुद्ध हिंदू मतांचे धुव्रीकरण झाले नसते, असेही कृष्णन यांनी म्हटले आहे. कोरोना व्यवस्थापनावरून मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 6:09 AM