ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या जबाबासहित त्याच्याशी संबंधित माहिती तात्काळ नॅशनल आर्काइव्ज या वेबसाईटवर सार्वजनिक करा, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगानं दिला आहे. माहिती आयुक्त श्रीधर अचार्युलु म्हणाले, नथुराम गोडसे आणि सहआरोपी याच्याशी काही संबंध नसला तरी त्यांचे विचार जगासमोर ठेवण्यासाठी नकार देऊ शकत नाही. नथुराम गोडसेच्या सिद्धांत आणि विचारांशी सहमत असलेली व्यक्ती एखाद्याची हत्या करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. नथुराम गोडसे यांनी 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधींची हत्या केली. याचिकाकर्ते आशुतोष बन्सल यांनी या हत्याकांडाबाबतची चार्जशीट आणि गोडसेच्या जबाबासहित इतर माहितीची दिल्ली पोलिसांकडे मागणी केली आहे. दिल्लीत पोलिसांनी नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियाकडे माहिती सोपवली असून, बन्सल यांना त्यांच्याकडे पाठवलं आहे. नॅशनल आर्काइव्ज यांनी माहिती पाहून सांगतो, असं म्हटलं आहे. तसेच माहिती आयुक्त अचार्युलु यांनी बन्सल यांना फोटोकॉपी देण्यासाठी प्रतिपृष्ठ तीन रुपये दर न आकारण्याचेही निर्देश दिले आहेत. गोडसेसंदर्भात माहिती 20 वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यामुळे ती आरटीआय कलम 8(1)(a) अंतर्गत येत असल्यास तिला गोपनीय ठेवता येणार नाही. गोडसेच्या जबाबानं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये शत्रूता निर्माण होणार नाही. महात्मा गांधींचे जीवन, चरित्र आणि विचार अजरामर आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात कितीही लिहिलं किंवा विचार मांडले तरी त्यांची महानायकाची प्रतिमा पुसता येणार नाही.
गांधींचा मारेकरी नथुरामचा जबाब सार्वजनिक करा- CIC
By admin | Published: February 17, 2017 9:55 PM