माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 03:21 PM2021-11-24T15:21:27+5:302021-11-24T15:24:14+5:30
2005 मध्ये लालू प्रसाद यादव यांनीही बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील, असे विधान केले होते.
झुंझुनू :राजस्थानमधील फेरबदलानंतर ग्रामविकास राज्यमंत्री झालेल्या राजेंद्र गुडा यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या विधानसभा मतदारसंघात पोहोचलेल्या मंत्री गुढा यांच्याकडे लोकांनी खराब रस्त्यांबद्दल तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्यांना सांगितले की, 'माझ्या गावात कतरिना कैफच्या(Katrina Kaif ) गालासारखे रस्ते बनवा', असे निर्देश दिले.
अधिकाऱ्याला बजावताना गुढा म्हणाले की, माझ्या गावातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे बनवा. त्यानंतर लगेच त्यांनीच हेमा मालिनी आता म्हातारी झाल्याचे सांगितले आणि जनतेला विचारले की आजकाल कोणती अभिनेत्री चर्चेत आहे, त्यावर उपस्थितांनी कतरिना कैफचे नाव घेतले. त्यानंतर, माझ्या भागात कतरिना कैफच्या गालासारखा गुळगुळीत रस्ते बनवा, असं ते म्हणाले. बसपातून काँग्रेसमध्ये आलेल्या राजेंद्रसिंह गुढा यांना अशोक गेहलोत यांनी नुकतेच राज्यमंत्री केले आहे.
यापूर्वी अनेकांनी असे वक्तव्य केलंय
चित्रपट अभिनेत्रींच्या गालासारखे रस्ते बनवण्याची राजकारण्यांची विधाने नवीन नाहीत. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांच्यापासून अनेक राज्यांच्या मंत्र्यांनी अशी विधाने केली आहेत. 2005 मध्ये पहिल्यांदा लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील, असे विधान केले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये, मध्य प्रदेशचे तत्कालीन मंत्री पीसी शर्मा यांनी खराब रस्त्यांना भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या गालाप्रमाणे सांगून त्यांनीही हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे रस्ते बांधण्याचे वक्तव्य केले होते.