ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मन भाषेचा विषय वगळण्यात आल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या संस्कृत भारती या संघटनेने सीबीएसई शाळांमध्येही परदेशी भाषांऐवजी संस्कृत भाषेचा विषय बंधनकारक करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मनुष्य बळ विकास खात्याने केंद्रीय विद्यालयांमध्ये तिस-या भाषेसाठी जर्मनऐवजी संस्कृत हा विषय शिकवण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन देशभरात वाद निर्माण झाला व जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनीदेखील मोदींशी यासंदर्भात चर्चा केली होती. हा वाद ताजा असतानाच संस्कृती भारतीचे सचिव आणि संघाचे प्रचारक दिनेश कामत यांनी सीबीएसई शाळांमध्येही परदेशी भाषांऐवजी संस्कृत भाषा शिकवण्याची मागणी केली आहे. संस्कृत भाषेची माहिती नसल्यास तुम्ही स्वतःला भारतीय कसे समजू शकता असा उलट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. संस्कृत भाषा ही भारतीय आणि युरोपीय भाषांची जननी असून दुर्दैवाने आता पर्शियन आणि उर्दू भाषेतील शब्दांचा वापर वाढल्याचे त्यांनी संगितले. स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने संस्कृत भाषेचा -हास करण्याचा प्रयत्न केला अशी टीकाही त्यांनी केली.