'सोनिया गांधींच्याजागी शरद पवारांना UPA अध्यक्ष करा, असं म्हणालोच नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 10:52 AM2021-04-02T10:52:15+5:302021-04-02T10:53:31+5:30
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
मुंबई : काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी करावं असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा केलं. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त राऊतांना लक्ष्य केलं. शिवसेना यूपीएचा भाग नाही. त्यामुळे राऊत यांनी उगाच सल्ले देऊ नये, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर, आत संजय राऊत यांनी आपण तसे विधान केले नसल्याचा दावा केला आहे. युपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीला मजूबत करण्याची गरज मी व्यक्त केली होती, असेही ते म्हणाले.
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. कोणाला मी शरद पवारांचा प्रवक्ता वाटत असेल तर मला त्याचा आनंदच आहे. पवार यांच्या विधानांचं समर्थन करणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. शरद पवारांचं काम अतिशय मोठं आहे. त्यांच्या कामगिरीसाठी मोदी सरकारनं त्यांना पद्मविभूषण दिलं आहे. मी शरद पवारांचा असण्याचा-नसण्याचा प्रश्न नाही, असं राऊत म्हणाले.
मी अनेकदा सोनिया गांधी, राहुल गांधींवर होणाऱ्या टीकेवरही बोललो आहे. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा प्रवक्ता होतो का? सोनिया, राहुल यांच्यावर टीका होत असताना ही सगळी मंडळी कुठे होती?, असा उलट सवालही त्यांनी विचारला. तसेच, सोनिया गांधींच्या जागेवर शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करावे, असे विधान मी केलेच नाही. केवळ, संयुक्त पुरोगामी आघाडीला बळकट करण्यासाठीचं ते विधान होतं, असेही स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय.
Shiv Sena leader Sanjay Raut claims he never said Congress chief Sonia Gandhi should be replaced by NCP president Sharad Pawar as UPA chairperson, says he only underscored need to strengthen alliance
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2021
मी पहाडासारखा उभा राहतो
राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं जातं. त्यांची टिंगल केली गेली. सोनिया गांधी यांच्यावर टीका करताना विरोधकांनी मर्यादा ओलांडली. तेव्हा मी त्यांच्यासाठी पहाडासारखा उभा होतो. ही गोष्ट काँग्रेस नेते नाना पटोलेंना माहीत नाही. पण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना त्याची कल्पना आहे, असं राऊत म्हणाले. यूपीए मजबूत करणं देशाची गरज आहे. ती कोण करतंय याला महत्त्व नाही. पण ती भक्कमपणे उभी राहायला हवी, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.