लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘विद्यार्थ्यांवर काही थोपविण्याऐवजी त्यांच्यामध्ये असलेल्या अंगभूत गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांना प्रयोगशील केले तर सामर्थ्यशाली भारताची निर्मिती होईल,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या पाचव्या सत्रात पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तालकटोरा स्टेडियममध्ये विविध शाळांमधील एक हजार विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंगची पाहणी केली.
यावेळी बोलताना विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या विविध प्रश्नांना पंतप्रधानांनी सविस्तरपणे उत्तर दिले. जवळपास अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाचे देशातील विविध भागांतूनही विद्यार्थी आभासी पद्धतीने जोडले गेले होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यावर अधिक भर दिला. परीक्षांचे ओझे न मानता, जीवनात सकारात्मक राहून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया जीवनात निरंतर सुरू ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी नवीन शिक्षण धोरणावरही त्यांनी भाष्य केले.