नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने आसनांचा ‘आगाऊ आरक्षण कालावधी’ (एआरपी) १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस केला आहे. म्हणजेच आता प्रवासाच्या केवळ ६० दिवस आधी रेल्वे आसनाचे आरक्षण करता येऊ शकेल. आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.
रेल्वे बोर्डाने १६ ऑक्टोबर रोजी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२४ पासून आगाऊ आरक्षणाची कालमर्यादा १२० दिवसांवरून घटवून ६० दिवस (प्रवासाची तारीख सोडून) करण्यात आली आहे. या निर्णयामागील कोणतेही कारण या परिपत्रकात देण्यात आलेले नाही.
ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस यांसारख्या दिवसा चालणाऱ्या काही रेल्वेच्या कालमर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारण त्यांची कालमर्यादा आधीच कमी आहे. विदेशी पर्यटकांसाठी असलेल्या ३६५ दिवसांच्या कालमर्यादेतही कोणताच बदल करण्यात आलेला नाही.
आधी किती होता कालावधी?- आधी एआरपी कालावधी ६० दिवसांचाच होता. २०१५मध्ये तो वाढवून १२० दिवसांचा केला होता.- ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली १२० दिवसांची आगाऊ आरक्षणे वैध असतील. तसेच ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे बुकिंग रद्द करण्याचीही अनुमती असेल.