ऑनलाइन लोकमत -
चंदिगड, दि. 21 - ज्याप्रमाणे मोबाईल फोन तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे, त्याप्रमाणे योगालाही महत्वाचा भाग बनवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दुस-या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तब्बल 30 हजार लोकांना या कार्यक्रमात सहभाग घेतला. या ठिकाणी योगासनेदेखील करण्यात आली ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सहभागी झाले होते.
संपुर्ण जगाने योगा दिवसाच्या ठरावाला समर्थन दिलं आहे. समाजातील सर्व स्तरातून आपल्याला समर्थन मिळालं आहे. मात्र काही लोकांना अजूनही योगाची ताकद आणि फायदे कळत नाहीत अशी खंत मोदींनी व्यक्त केली. योगा दिवस उत्तम आरोग्याशी जोडला गेला आहे, आणि आता याचं रुपांतर मोठ्या चळवळीत झालं आहे. योगा आस्तिक व्यक्तींसाठीदेखील आहे आणि नास्तिकांसाठीदेखील आहे असं मोदी बोलले आहेत.
PM Narendra Modi at a Yoga camp in chandigarh #YogaDaypic.twitter.com/5OxDjgwNH4— ANI (@ANI_news) June 21, 2016
योगामध्ये कोणतीही गुंतवणूक नसून शून्य बजेटवर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स देतं असं सांगत नरेंद्र मोदींनी योगाचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. योगा गरिब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नाही. गरोदर महिलांसाठीही स्त्रीरोग तज्ञ योगाचा सल्ला देत आहेत. पुढील वर्षीपासून योगा दिनाच्या निमित्ताने दोन पुरस्कार देण्यात येतील, ज्यांनी योगाला प्रसिद्धी दिली आहे त्यांचा सन्मान करण्यात येईल अशी घोषणाही मोदींनी यावेळी केली आहे.
PM Narendra Modi doing Yoga in Chandigarh #YogaDaypic.twitter.com/u3WXfBS5EZ— ANI (@ANI_news) June 21, 2016
एक लाख ठिकाणी होणार आज योग दिन
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत सरकारने देशभरात एक लाख २६० ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम आयोजित केले आहेत. हे सर्व कार्यक्रम स. ६.३० वाजता सुरु करण्यात आले. लाखो नागरिक ४५ मिनिटे पूर्वनिर्धारित योगासने व योगमुद्रा करतील. याखेरीज जगाच्या कानाकोपऱ्यातील १७३ देशांमध्ये असलेल्या भारतीय दूतावासांमध्येही, योगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी, योगासनांची प्रात्यक्षिके व अनुषंगिक कार्यक्रम आयोजित केले जातील.
राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करतील व त्यात राष्ट्रपती भवनातील कर्मचारी, अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलांचे जवान यांच्यासह सुमारे एक हजार व्यक्ती सहभागी होतील. युवाकार्य आणि क्रीडा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी सोमवारी ही माहिती दिली.
मराठी मुलांचा आवाज
यंदाच्या योग दिनानिमित्त सरकारने ४५ मिनिटांच्या ‘योग प्रोटोकॉल’खेरीज एक योगाचे महत्त्व विषद करणारे एक विशेष ‘योग गीत’ही जारी केले आहे. ३ मिनिटे १५ सेकंदांचे हे हिंदी गाणे धीरज सारस्वत यांनी तयार केले असून, सुमोतो रे यांच्या संगीत दिग्दर्शनात गंधार जाधव व गाथा जाधव या मराठी मुलांनी ते गायले आहे.
१७७ देशांचा पाठिंबा
संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असलेल्या १९३ पैकी १७७ देशांनी दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.