त्रिवेंद्रम : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखीच तुमची अवस्था करू, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारे पत्र केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना पाठविण्यात आले आहे. मोदी यांच्या केरळमधील कार्यक्रमात मानवी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे.
तामिळनाडू येथील श्रीपेरंबुदूर येथे २१ मे १९९१ रोजी बॉम्बस्फोट घडवून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. मोदींना धमकी देणारे पत्र मल्याळम भाषेत लिहिले असून, ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी सांगितले. मोदी २४ एप्रिलपासून केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. धमकीचे हे पत्र के. सुरेंद्रन यांना १७ एप्रिल रोजी मिळाले. ते पत्र एर्नाकुलम येथील रहिवासी जोसेफ जॉनी याने पाठविल्याचा उल्लेख आहे. मात्र, आपण असे पत्र पाठविले नसल्याचे जोसेफ याने पोलिस चौकशीदरम्यान सांगितले. पत्रातील व जोसेफ जॉनीचे हस्ताक्षर जुळत नसल्याचेही पोलिसांना आढळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीचे पत्र आल्याने व त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केरळमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)