हैदराबाद - मोबाईल आणि सोशल मीडियाच्या नादात तरुणाई काय करेल हे सांगता येत नाही. सेल्फीची क्रेझ आता रिल्स आणि व्लॉगवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, सेल्फी घेण्यासाठी धडपडणारा युवा वर्ग आता रिल्स बनवण्यासाठी आणि तो सोशल मीडियावर शेअर करुन नेटीझन्सचं अटेंशन मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सेल्फीच्या नादात जीव गमावलेल्या घटना घडल्या असतानाच, आता रिल्स बनवण्याच्या नादात एका १६ वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे ही घटना घडली आहे.
धावत्या ट्रेन जवळ उभे राहून रिल्स बनवण्याच्या नादात १६ वर्षीय युवकाचा भीषण अपघात झाला. मोहम्मद सरफराज असे युवकाचे नाव असून तो वेगात आलेल्या रेल्वेच्या रुळाशेजारी उभे राहून रिल्ससाठी शुंटीग करत होता. मात्र, त्याचवेळी तो रेल्वेने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, रिल्ससाठी शुटींग करणारे सरफराजचे दोन मित्र दूर पळून गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
येथील तीन मित्र इंस्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी रेल्वे ट्रॅकवर गेले होते. सरफराज हे रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ अंगात पांढरा कुर्ता आणि डोळ्यावर गॉगल घालून पोझ देत होता. तर, त्याचे दोन मित्र समोरुन व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होते. मात्र, रेल्वेच्या स्पीडचा आणि विड्थचा अंदाच न आल्याने सरफराज रेल्वेच्या तडाक्यात सापडला. सुदैवाने त्याच्या दोन्ही मित्रांनी रेल्वेचा अंदाज घेत बाजुला उडी मारली. त्यामुळे, दोघे बचावले. मात्र, सरफराजचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर झाला आहे. तर, सरफराजच्या वडिलांचाही व्हिडिओ आहे, त्यामध्ये, सरफराज शुक्रवारी नमाजसाठी घराबाहेर पडला होता. मात्र, काही तासांतच त्याच्या मित्रांकडून ही दुर्घटना घडल्याचे समजल्याचे त्यांनी सांगितले.