नवी दिल्ली : वाहनांत बहुइंधनी इंजिन वापरणे बंधनकारक करण्यासंबंधीचा आदेश येत्या तीन ते चार महिन्यांत जारी करू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
पुण्यातील एका उड्डाणपुलाचा पायाभरणी समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. गडकरी यांनी सांगितले की, माझ्या जीवनकाळात देश पेट्रोल-डिझेलच्या वापरापासून पूर्णत: मुक्त होऊन स्थानिक पातळीवर बनणाऱ्या इथेनॉलच्या वापराकडे वळलेला मला पाहायचा आहे.
आगामी तीन ते चार महिन्यांत मी एक आदेश जारी करणार आहे. त्यात मी बीएमडब्ल्यूपासून मर्सिडिजपर्यंत, तसेच टाटापासून महिंद्रापर्यंत सर्व कंपन्यांना आपल्या कारमध्ये बहुइंधनी इंजिन बसविण्यास सांगणार आहे. बजाज, टीव्हीएस या कंपन्यांना हुइंधनी इंजिन वापरण्याचा सूचना याआधीच दिल्या आहेत.