नवी दिल्ली - मक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात 11 वर्षानंतर न्यायालयानं निकाल दिला. या स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या स्वामी असीमानंद आणि इतर पाच जणांची सुटका करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयानं हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं प्रकरणातील सर्व आरोपींची सुटका केली. स्वामी असीमानंद हे या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होते.
दरम्यान, मक्का मशिदीत स्फोट प्रकरणातील आरोपींची सुटका करण्यात आल्यानंतर काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. या निकालानंतर हिंदूना बदनाम करण्याचा आरोप भाजपानं काँग्रेसवर केला आहे. भाजपानं केलेल्या आरोपावर काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांनी मौन बागळल्याचं दिसत आहे. मात्र पी.एल. पुनिया यांनी प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, काँग्रेस पार्टी किंवा राहुल गांधी यांनी कधीही 'भगवा दहशतवाद' या शब्दाचा कधीही प्रयोग केला नव्हता.
काँग्रेसनं 'भगवा दहशतवाद' असा शब्दप्रयोग करत हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपानं केला. यासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही भाजपानं केली. यावर काँग्रेसचे पी.एल.पुनिया यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, 'भगवा दहशतवाद असे काही नसते आणि दहशतवाद हा कोणत्याही धर्म किंवा समुदायासोबत जोडला जाऊ शकत नाही'. शिवाय राहुल गांधी किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यानं भगवा दहशतवाद' असा शब्दप्रयोग कधी केलेला नव्हता.
2010 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी पोलीस अधिका-यांच्या एका सम्मेलनात म्हटले होते की, ''देशातील झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये भगव्या दहशतवादाचा हात आहे. भगवा दहशतवाद हा देशापुढे नवीन आव्हान बनून उभे राहत आहे''. चिदंबरम यांच्या या विधानावरुन भाजपा-शिवसेनेच्या खासदारांनीही त्यावेळी आक्षेप नोंदवत संसदेत गोंधळ घातला होता. 2013मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात 'हिंदू दहशतवाद' या शब्दाचा प्रयोग केला होता. यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. दहशतवाद हा कोणत्याही धर्म किंवा रंगाचा नसतो, असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
मक्का मस्जिद स्फोट प्रकरण
11 मे 2007 रोजी मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. यानंतर आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 10 पैकी 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद उर्फ नबा कुमार सरकार, भारत मोहनलाल रत्नेश्वर उर्फ भारत भाई आणि राजेंद्र चौधरी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. या सर्वांना मक्का मशीद स्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती.