ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - एकीकडे सीमेवरील तणावामुळे चीनशी ताणलेले संबंध आणि चीनकडून घेण्यात येत असलेला तीव्र आक्षेप यांना डावलून भारत, अमेरिका आणि जपान यांच्या नौदलांमध्या मलबार सरावाला प्रारंभ झाला आहे. तिन्ही देशांमधील सैनिकी संबंधांना दृढ करणे हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावाचे हे २१ वे पर्व असून, हा संयुक्त नाविक सराव १७ जुलैपर्यंत चालणार आहे.
भारतीय नौदलाच्या पूर्वैकडील नाविक आघाडीचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चिफ एच.सी.एस. बिस्ट यांनी बंगालच्या उपसागरामध्ये हा सराव सुरू झाल्याची घोषणा केली. ते म्हणाले, "समान आव्हाने आणि संकटांचा सामना करणे हे या सरावाचे उद्दीष्ट आहे." मात्र भारतीय समुद्रामध्ये चीनी पाणबुड्यांच्या हालचालींबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले.
दरम्यान भारत, अमेरिका आणि जपान यांच्यातील नाविक सरावाबाबत चीनची भूमिका काय असेल या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या स्ट्राइक ग्रुप ११ चे कमांडर रियर अॅडमिरल विल्यम डी. ब्रायन म्हणाले, "या सरावातून एकच संदेश जातो तो म्हणजे आम्ही सोबत राहून चांगले काम करू शकतो. तसेच संभाव्य संकटांना पूर्णपणे संपुष्टात आणू शकतो."
अधिक वाचाचीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू चीनच्या धमक्या आणखी वाढल्याभूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावाभूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा
मलबार येथे सुरू असलेल्या या तीन देशांच्या सरावामध्ये १६ युद्धनौका, ९५ विमाने आणि दोन पाणबुड्यांनी सहभाग घेतला आहे. या सरावात जपानच्या मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सने सलग चौथ्या वर्षी सहभाग घेतला आहे. १९९२ पासून भारत आणि अमेरिका बंगालच्या उपसागरात दरवर्षी नाविक सरावाचे आयोजन करत आहे.