तिरुवनंतपुरम - मल्याळम चित्रपट सृष्टीमधील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहनलाल याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहनलाल यांनी या भेटीची माहिती ट्विटरवरून दिली. या भेटीनंतर मोहनलाल हा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. तसेच तो भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूकही लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहनलाल याच्याशी झालेल्या मुलाखतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीची माहिती देणारे ट्विट केले आहे. सोमवारी मोहनलाल यांच्यासोबत खूप चांगली भेट झाली. त्यांची विनम्रता प्रशंसेस पात्र आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे." असे मोदी या भेटीबाबत म्हणाले.
राजकीय विश्लेषकांच्या मते देवभूमी मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये कमल उमलवण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील असलेल्या भाजपासाठी मोहनलाल हे ट्रम्पकार्ड ठरू शकतात. दरम्यान, मोहनलाल यांना भाजपाकडून तिरुवनंतपुरम लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोहनलाल यांना आरएसएसचाही संपूर्ण पाठिंबा असल्याचे मानण्यात येत आहे. तसेच मोहनलाल हे भाजपात सामील व्हावेत यासाठी आरएसएसकडून दीर्घकाळापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र भाजपाचे केरळमधील नेते मुरलीधर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. असे असले तरी मोहनलाल हे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच असेल, असेही मुरलीधर यांनी सांगितले आहे. केरळमध्ये झालेल्या मागच्या विधानलसभा निवडणुकीत भाजपाला खाते उघडण्यात यश मिळाले होते. तसेच मतांच्या टक्केवारीतही लक्षणीय वाढ झाली होती. दरम्यान, राजशेखरन हे मिझोरमचे राज्यपाल झाल्यानंतर आता त्यांना पर्यात म्हणून तिरुवनंतपुरम मतदारसंघातून मोहनलाल हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.