कोलकाता - दिवाळीच्या निमित्ताने अनेक ई-कॉमर्स कंपन्या सेलचं आयोजन करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. अॅमेझॉनवरून स्मार्टफोन मागवणं एका ग्राहकाला चांगलंच महागात पडलं आहे. यावेळी एका खासदाराची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. भाजपाच्या खासदाराला ऑनलाईन फोन मागवल्याचा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मालदा येथील भाजपाचे खासदार खागेन मुर्मू यांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. खागेन मुर्मू यांनी आपल्यासाठी सॅमसंगचा स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा पार्सल हातात आलं आणि त्यांनी ते उघडून पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण फोनच्या बॉक्समध्ये मोबाईल नसून दोन दगड होते. या प्रकरणी मुर्मू यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
'अॅमेझॉनवरून माझ्या मुलाने माझ्यासाठी सॅमसंगचा मोबाईल ऑर्डर केला होता. आम्ही अॅमेझॉनचं पार्सल ओपन केलं तेव्हा मात्र त्यामध्ये Redmi 5A या स्मार्टफोनचा बॉक्स दिसला. तो ओपन करून पाहिल्यावर त्यामध्ये आम्हाला दोन दगड मिळाले आहेत' असं भाजपाचे खासदार खागेन मुर्मू यांनी म्हटलं आहे. मुर्मू यांनी साधारण आठवठ्याभरापूर्वी एक फोन ऑनलाईन ऑर्डर केला होता. दिवाळीच्या दिवशी त्याची डिलिव्हरी होणार होती. ज्यावेळी ऑर्डर त्यांच्या घरी आली तेव्हा खासदार घरात उपस्थित नव्हते. त्यांच्या पत्नीने कॅश ऑन डिलिव्हरीच्या ऑप्शनप्रमाणे 11,900 रुपये देऊन अॅमेझॉनचं आलेलं पार्सल घेतलं. मात्र ओपन केल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
मालदाचे पोलीस अधिकारी आलोक राजोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्मू यांनी मालदा बाजारच्या इंग्लिश बाजार पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास करत आहोत. मुर्मू यांनी याआधी कधीच कोणत्याच वस्तूची ऑनलाईन खरेदी केलेली नाही. यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या मुलाने त्यांच्यासाठी अॅमेझॉनवरून ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला होता. मात्र ओपन करून पाहिल्यावर त्यात दगड असल्याची माहिती मुर्मू यांनी पोलिसांनी दिली आहे.