नवी दिल्ली : मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांना भारतात बेकायदेशीररित्या दाखल होण्याच्या आरोपाखाली भारतीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे घडली.
माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांना तूतीकोरिन बंदरावरुन अटक करण्यात आली. ज्यावेळी अहमद अदीब भारतात बेकायदेशीरिरत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी भारतीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली.
अहमद अदीब यांना भारतीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी मीडियाशी बोलताना सांगितेल की, 'या घटनेची आम्ही सत्यता पडताळून पाहत आहोत. तसेच, मालदीवच्या सरकारशी संपर्क साधून त्यांच्याकडून याबाबत माहिती खरी आहे की नाही? हे जाणून घेऊ.'
“विर्गो 9” या बोटीतून अहमद अदीब भारतीय किनाऱ्यावर दाखल झाले होते. यावेळी जवळपास 10 जण होते. दरम्यान, अहमद अदीब यांना भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांखाली अटक करण्यात आली होती आणि त्यांना मालदीवच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, सध्या त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे, याबाबत तपास यंत्रणांनी काहीच सांगितले नाही.