नवी दिल्ली : मालदीव सरकारचा एक पूर्ण बेट सौदी अरबच्या हवाली करण्याचा बेत असून, त्यामुळे भारतासमक्ष सुरक्षेच्या दृष्टीने एक नवीन आव्हान उभे ठाकले जाऊ शकते. मालदीव सरकारच्या या निर्णयावरून मालदीवमध्ये वाद उफाळला असून, विरोधी मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) तीव्र आक्षेप घेत म्हटले आहे की, फा-फू हे बेट सौदी अरेबियाच्या हवाली केल्यास मालदीवमध्ये कट्टरतावाद वाढीस लागेल.मालदीवमध्ये एकूण २६ बेटे असून त्यापैकी ‘फा-फू’ हे एक बेट आहे. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद हे लवकरच मालदीवला भेट देणार आहेत. एमडीपीचे सदस्य आणि माजी विदेशमंत्री अहमद नसीम यांनी म्हटले आहे की, मालदीवच्या यामीन सरकारने हा निर्णय घेताना जनतेचे मत जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. मालदीवमध्ये पूर्वी जमीन विकणे हा देशद्रोह मानला जात असे. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या घटनात्मक दुरुस्तीनंतर मालदीवमध्ये विदेशींना जमीन खरेदी करण्याची मुभा मिळाली.एमडीपीनुसार मालदीवमध्ये सौदी ३०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. मालदीव सरकारचा सौदी शिक्षक आणण्याचा बेत असून, या निर्णयामुळे येथील शाळांचे रूपांतर मदरशात होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सौदी अरेबियाला देणार मालदीव एक बेट
By admin | Published: March 04, 2017 4:41 AM