नवी दिल्ली : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम एका स्पीड बोटीत (वेगवान नाव) झालेल्या स्फोटातून सोमवारी थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या पत्नी आणि इतर दोन जण जखमी झाले. अब्दुल्ला यामीन हज यात्रेवरून परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेचा सखोल तपास करण्यात येईल, असे पोलीस प्रमुख हमदुन रशीद यांनी सांगितले. यामीन (५९) आणि त्यांच्या पत्नी फातिमा इब्राहीम नजीकच्या हुलहुल येथील इब्राहीम नासिर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. तेथून राजधानी मालेला येत असताना त्यांच्या स्पीडबोटीत स्फोट झाला. या दुर्घटनेत राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. मात्र, त्यांची इजा गंभीर नाही. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. तथापि स्फोट इंजिन असलेल्या भागात झाला. मालदीवचे भारतातील उच्चायुक्त अहमद मोहंमद यांनी दिल्लीत सांगितले की, हज यात्रा करून राष्ट्राध्यक्ष सपत्नीक विमानतळावरून परतत होते, तेव्हा स्फोट झाला. राष्ट्राध्यक्ष जखमी झाले नाहीत; परंतु त्यांच्या पत्नीला इजा झाली. त्यांच्यावर इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार त्यांची दुखापत गंभीर नाही. स्फोटानंतर राष्ट्राध्यक्षांना सोबतच्या पोलीस स्पीड बोटमध्ये बसवून मालेला नेण्यात आले, असे ते म्हणाले.मालदीवमध्ये अलीकडच्या काही वर्षांत राजकीय संघर्ष आणि वादाचे प्रसंग घडले आहेत; परंतु तेथे कधीही बॉम्बहल्ल्यासारखा गंभीर राजकीय हिंसाचार झालेला नाही. यामीन हे देशात आणि विदेशातही वादग्रस्त राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत मोहंमद नशीद यांचा पराभव करून ते सत्तेवर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मालदीवचे अध्यक्ष स्फोटातून बचावले
By admin | Published: September 28, 2015 11:39 PM