मालदीव आणि भारतामधील संबंध आता ताणले गेले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांनी भारतीय सैन्याच्या पहिल्या तुकडीला १० मार्चपूर्वी भारतात पाठविणार असल्याचे म्हटले आहे. तर अन्य दोन विमान प्लॅटफॉर्मवरील सैन्याला १० मे पर्यंत माघारी पाठविले जाणार असल्याचे ते आज म्हणाले आहेत.
संसदेत आज त्यांनी यावर भाष्य केले. मालदीवच्या लोकांना आपल्याला पाठिंबा दिला कारण त्यांना परदेशी सैन्याला हटवावे वाटत होते. तसेच आम्ही गमावलेला समुद्र देखील परत घ्यायचा आहे, असे मोइज्जू म्हणाले. आमचे सरकार अशा कोणत्याही समझोत्याला मंजुरी देणार नाही, जो देशाच्या संप्रुभतेविरोधात असेल, असे ते म्हणाले.
मोईज्जू हे १७ नोव्हेंबरला राष्ट्रपती बनले होते. तेव्हाच त्यांनी भारताचे ८८ सैनिक परत पाठविणार असल्याचे भाष्य केले होते.
यावर आता भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची प्रतिक्रिया आली आहे. मालदीवने भारताविरोधात आणखी एक वक्तव्य केले आहे. यावर मोदी एवढेच म्हणतील, “कोई बोला नहीं और कोई रोता नहीं…”. अशा शब्दांत स्वामी यांनी मोदींच्या चुप्पीवर संधान साधले आहे. स्वामी यांनी ट्विट केले आहे.