रुद्रपूर : पंतनगर विमानतळावरील एका अधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आला. उत्तराखंड येथील उधमसिंह नगर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. या अधिकाऱ्याने साडी नेसली होती तसेच कपाळाला टिकली व ओठांना लिपस्टिक लावलेली होती. या अधिकाऱ्याचे नाव आशिष चौसाली असून, त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. आशिष यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांचा कयास आहे. त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळले.
दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा आशिष चौसाली हे गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले. आशिष हे पंतनगर विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. त्यांची पत्नी पिथौरागढ येथील एका शाळेत शिक्षिका आहे. या दाम्पत्याला अडीच वर्षे वयाची मुलगी आहे. पोलिसांनी आशिष चौसाली यांच्या मोबाइल फोनमधील माहितीची छाननी सुरू केली आहे.