ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहीत यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) क्लीन चीट देण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. तसेच साध्वी प्रज्ञा व कर्नल पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मोक्काही हटवण्यात येणार असल्याचे समजते.
' इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रानुसार याप्रकरणी एनआयए आज मुंबईतील मेट्रोपोलिटियन कोर्टात आरोपपत्र दाखल करणार असून त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा आरोपी म्हणून उल्लेख न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांची तुरूंगातून लौकर सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हटले आहे आरोपपत्रात?
- या स्फोटांप्रकरणी सुरूवातीस दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासाबाबतही एनआयएने प्रश्न उपस्थित केले असून तत्कालिन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी याप्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास केल्याचा आरोपही एनआयने आरोपपत्रात लावला आहे.
- आरोपींवर दबाव टाकून एटीएसने खोट जबाब नोंदवले, तसेच कर्नल पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात एटीएसनेच बॉम्ब ठेवून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचे एनआयएने आरोपपत्रात नमूद केले आहे.
दरम्यान यापूर्वीच एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहीत यांच्यावर लावण्यात आलेला मोक्का हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते. केंद्रात सत्ता पालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.
मालेगाव स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश आपल्याला एनआयएच्या अधिका-याने दिला होता, असा गौप्यस्फोट याप्रकरणातील विशेष सरकारी वकिल रोहिणी सलियन यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. केंद्रात मोदींचं सरकार आल्यानंतरच हा बदल झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.
कधी झाले होते स्फोट?
२९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या मालेगाव स्फोटात ४ जण ठार, ७९ जण जखमी झाले होते. या स्फोटामागे कडव्या हिंदुत्ववादी संघटनाचा हात असल्याचं तपासात पुढे आलं. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती.