मुंबई, दि. 19 - मालेगावमधील 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाकडून लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना जामीन मंजूर केल्यानंतर आता आरोपी सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांना आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचा जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टात अर्ज केला होता. यावर कोर्टाने दोघांना हमीपत्रासह व्यक्तीगत पाच लाखांच्या बॉंडवर जामीन मंजूर केला आहे. मालेगावमध्ये 2008 साली बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता, तर 80 हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचा सुप्रीम कोर्टाच्या न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. यावेळी त्यांना कोर्टात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, साक्षी-पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करणे, पासपोर्ट जमा करणे व पूर्वानुमतीशिवाय देश सोडून बाहेर न जाणे अशा अटींवर हा जामीन मंजूर केला आहे.
या कारणांमुळे पुरोहित ‘बाहेर’...राष्ट्रीय तपास यंत्रणेने सादर केलेले पुरवणी आरोपपत्र आणि महाराष्ट्र एटीएसने दाखल केलेले मूळ आरोपपत्र यातील तफावत, खटला लवकर संपण्याची शक्यता नसणे आणि पुरोहित यांचे आठ वर्षे आठ महिने तुरुंगात असणे या बाबी जामीन देताना न्यायालयाने नमूद केल्या. तपासी यंत्रणेला तपास करण्याचा अधिकार असला तरी आरोपीच्या स्वातंत्र्याचा एका मर्यादेपलीकडे अनाठायी संकोच केला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.