नबीन सिन्हा, नवी दिल्लीसीबीआयने किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांच्या नऊ हजार कोटींचे कर्ज प्रकरण हाती घेत तपासाची व्याप्ती वाढविली आहे. मल्ल्या यांनी आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत ठेवले असून यापूर्वी सीबीआयकडे केवळ या प्रकरणाचा तपास होता. स्टेट बँकेच्या नेतृत्वातील १७ बँकांचे एकूण नऊ हजार कोटी रुपये बुडविल्यानंतर मल्ल्या लंडनला पसार झाले. व्याप्ती वाढविण्यात आल्यामुळे आता सीबीआय एकूण सर्व कर्ज प्रकरणांचा तपास करणार आहे.बँकांनी प्रारंभी कर्ज परत मिळविण्याला प्राधान्य दिल्यामुळे सीबीआयने पत्र पाठवूनही बँकांनी त्याबाबत तक्रार दाखल केली नव्हती. आयडीबीआयनेही स्वत:हून तक्रार दाखल केलेली नव्हती. गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर सीबीआयने गुन्हा नोंदविल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बँकांकडून तक्रारी आल्या नसताना सार्वजनिक पैशासंबंधी गुन्हे किंवा आर्थिक घोटाळ्याशी संबंधित पुरावे गोळा करणे अधिक ताण आणणारे ठरते, असे हा अधिकारी म्हणाला. बँकांनी तक्रारी दाखल न केल्यामुळे सीबीआयने आयडीबीआय बँकेसंबंधी एफआयआरची कक्षा वाढविली आहे.
मल्ल्यांची सर्व कर्जप्रकरणे आता सीबीआयकडे
By admin | Published: June 04, 2016 2:39 AM